Merry Christmas  
 
     
 
 

येशू ख्रिस्तांचा जन्म दिवस म्हणून २५ डिसेंबरला ख्रिस्तीबांधव नाताळ साजरा करतात. ख्रिस्ती बांधवांचा सर्वात मोठा सण असलेला नाताळ शहरातील विविध चर्चमध्ये ख्रिस्तीबांधवांनी विश्‍वशांतीचा आणि प्रेमाचा संदेश देत उत्साहाने साजरा केला.

 
 

शहरातील वायल्डर मेमोरियल चर्च, ख्राईस्ट चर्च, सेंट झेवियर्स चर्च, ब्रह्मपुरी येथील पवित्र उपासना मंदिर, विक्रमनगर चर्चसह शहरातील सर्वच चर्चमधून जगाच्या शांततेसाठी प्रार्थना केली. 
बुधवारी (ता. 24) रात्री बाराच्या ठोक्‍याला फटाक्‍यांची आतषबाजी करीत नाताळचे जल्लोषी स्वागत केले. तत्पूर्वी प्रार्थना झाल्या. गेल्या दहा दिवसांपासून सर्वच चर्चमध्ये नाताळचे कार्यक्रम सुरू आहेत. चार दिवसांपासून कॅरोल सिंगिंगलाही सुरवात करण्यात आली होती. प्रत्येक ख्रिस्ती कुटुंबात जाऊन कॅरोल सिंगिंग ग्रुप नाताळची गाणी गात होते. या उपक्रमामुळे नाताळचा आनंद द्विगुणित झाला. बालचमूही सांताक्‍लॉजच्या टोप्या परिधान करून कॅरोल सिंगिंगमध्ये सहभागी झाला. 

 
 

सकाळी आठपासून वायल्डर मेमोरियल चर्चमध्ये नाताळच्या प्रार्थनेला सुरवात झाली. आठ वाजता इंग्रजी भाषेतून तर साडेनऊ वाजता मराठी भाषेतील उपासनेला सुरवात झाली. रेव्ह. संजय चौधरी यांनी नाताळचा संदेश दिला. प्रार्थनेचे पुढारीपण रेव्ह. डी. बी. समुद्रे यांनी केले. या वेळी रेव्ह. जे. ए. हिरवे, चर्चचे विश्‍वस्त मंडळ, सचिव आदींसह ख्रिस्तीबांधव प्रार्थनेत मोठ्या संख्येने सहभागी झाले. नवीन कपडे, नवा उत्साह घेऊन हजारो ख्रिस्ती बांधवांनी प्रार्थनासभेला उपस्थिती लावली. 
वायल्डर मेमोरियल चर्चतर्फेही सायंकाळी अंध शाळा व सावित्रीबाई फुले रुग्णालयात फळांचे वाटप करण्यात आले. गरजू महिला, मुलांना कपडे वाटप करण्यात आले. विक्रमनगर चर्च येथे रेव्ह. आर. आर. मोहिते यांनी नाताळचा संदेश दिला. अमोल कदम यांनी स्तोत्र वाचन केले. सर्वच चर्चमध्ये उपासना करण्यात आली. 

आकर्षक रोषणाई 
वायल्डर मेमोरियल चर्च, ख्राईस्ट चर्च, सेंट झेवियर्स चर्च, ब्रह्मपुरी येथील पवित्र उपासना मंदिर, विक्रमनगर चर्चवर आकर्षक विद्युतरोषणाई करण्यात आली होती. प्रत्येक ख्रिस्ती वसाहतीमध्ये ख्रिसमस ट्री आणि प्रभू येशू ख्रिस्त जन्माचे देखावे सादर करण्यात आले.